Ad will apear here
Next
नाच रे मोरा...
चित्र : जिंगल टून्स यूट्यूब चॅनेल‘पुलोत्सवा’चा आनंद ओसरण्याच्या आतच बालदिनाची चाहूल लागते. आजच्या या बालदिनाच्या निमित्ताने ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’मध्ये आस्वाद घेऊ या ‘गदिमां’नी लिहिलेल्या, ‘पुलं’नी स्वरबद्ध केलेल्या नि आशाताईंनी गाऊन चिरस्मरणीय केलेल्या ‘नाच रे मोरा’ या बालगीताचा...
....................
हिरवाईनं आच्छादलेल्या छोट्या-मोठ्या डोंगरांच्या रांगा. अधूनमधून दिसणारं घाटमाथ्यावरचं माळरान आणि त्यामधून दूरवर घेऊन जाणारा काळाकभिन्न डांबरी रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा पिवळ्या फुलांनी, हिरव्या-पोपटी पानांनी डवरलेली झाडंझुडपं. हे सगळं निसर्गवैभव डोळ्यांमध्ये साठवत आमचा प्रवास सुरू होता. वैताग आणणाऱ्या रोजच्या ट्रॅफिक जॅम असलेल्या रस्त्यांपेक्षा हा रस्ता अगदी मोकळा, जणू फक्त आपल्यासाठीच आहे असा वाटत होता. पोहोचण्याचं ठिकाण किती दूर आहे... केव्हा पोहोचणार आपण, या विवंचनेत पडण्यापेक्षा वाटेवरचा सुंदर निसर्ग पाहत प्रवास केला, तर तो सुखकर होतो हे गुपित आम्हाला माहीत होतं. अचानक एका झुडपातून एक मोर रस्त्यावर आला... अगदी आमच्या गाडीपुढेच... गाडी थांबवली... ब्रेकच्या आवाजानं बावरलेला मोर आपलं सुंदर पिसाऱ्याचं ऐश्वर्य पेलत जमिनीपासून थोडासा उंच उडत रस्त्याच्या पलीकडच्या झुडपात दिसेनासा झाला. आनंदानं, आश्चर्यानं माझ्या तोंडून मोर... मोर... मोर... एवढेच शब्द बाहेर पडले. कितीतरी वेळ आम्ही त्या सुखद क्षणांच्या समाधीतच प्रवास करत राहिलो... आणि मग गप्पा सुरू झाल्या... विषय फक्त मोर आणि मोर... किती सुंदर, किती देखणा, निळा-जांभळा पिसारा, त्याच्या डोक्यावरचा ऐटबाज तुरा, त्याचे डोळे, त्याचा डौल... तो एकदम गाडीसमोर आला कसा... भुर्रकन उडाला कसा... हे सगळं बोलत असताना आपलं बालपण ज्या सुंदर गीतानं मोहरलं, ते गीत आपोआप ओठांवर आलं...

नाच रे मोरा नाच...

किती सुंदर योगायोग आहे बघा. ‘पुलोत्सवा’चा आनंद ओसरण्याच्या आतच बालदिनाची चाहूल लागते. बालदिन... बाळगोपाळांच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलवणारा, तसंच ‘निज शैशवास जपणे, बाणा कवीचा असे’ असं समजवणाऱ्या कविमनालाही साद घालणारा असतो. निरागस आनंदाचे धनी होण्यासाठी ‘नाच रे मोरा’सारखी गाणी मराठी रसिकांनी काळजात जपून ठेवलीयत. हे गाणं ऐकलं नाही किंवा या गाण्यावर ताल धरून नाचलं नाही, असं एक तरी मराठी मूल सापडेल का? अवघ्या बालविश्वाला व्यापून टाकलेलं हे गीत ग. दि. माडगूळकपरांनी लिहिलं आणि पु. ल. देशपांडे यांनी ते स्वरबद्ध केलं, असं सांगतानासुद्धा मनाचा मोरपिसारा फुलून येतो. पावसाचे दिवस नसतानाही ढगांचा काळा-काळा कापूस, टाळी देणारी वीज, पिसारा फुलवून नाचणारा मोर आपल्याला दिसायला लागतो. एखादं बालगीत असं अलौकिक आणि विलक्षण भाग्य घेऊन जन्माला येतं... आज बालदिन साजरा करताना या गाण्याची हमखास आठवण झाली. कारण या गाण्यामुळं मोहरलेलं आपलं बालपण नव्या पिढीतल्या मुलांकडं सुपूर्द करावंसं वाटतं...

ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी 
वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच... नाच रे मोरा...

फोटो : गदिमा डॉट कॉम‘देवबाप्पा’ या चित्रपटासाठी ‘गदिमां’नी हे गीत लिहिलं. १९५३ सालचा हा चित्रपट. ‘पुलोत्सवा’निमित्त हसता हसता आणि मधूनच डोळे पुसता पुसता ‘पुलं’च्या अनेक आठवणी आपण जागवल्या; पण ‘देवबाप्पा’ या चित्रपटाचं शीर्षक ‘पुलं’नी सुचवलं हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल. ‘देवबाप्पा’ या चित्रपटात बालनायिकेची भूमिका मेधा गुप्ते या चिमुकलीनं केली होती. राम गबाळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. प्रेम माणिक नावाचा मनुष्य राम गबाळे यांना भेटायला आला. त्याने एका गुजराथी कवीच्या कवितेवर एक कथा लिहिली होती. पितृछत्र हरवलेल्या एका छोट्या मुलीची ती कथा. ती मुलगी आपल्या मरण पावलेल्या वडिलांना पत्र लिहित असे. ३५० रुपये देऊन राम गबाळे यांनी ती कथा स्वीकारली. त्या कथेवर आधारित चित्रपट काढायचं ठरवलं. ‘पुलं’आणि राम गबाळे या चित्रपटाविषयी चर्चा करत असताना चित्रपटाला नाव काय द्यायचं, हा प्रश्न त्यांना पडला. ज्या ठिकाणी ते दोघं गप्पा मारत होते, तिथं एक देवाची मूर्ती होती. ‘पुलं’ चटकन म्हणाले चित्रपटाचं नाव ‘देवबाप्पा’ आणि मग एका हृदयस्पर्शी चित्रपटाची निर्मिती झाली. त्या बालनायिकेचं खूप कौतुक झालं. तिचा तो घेरदार सुंदर फ्रॉक आणि नाच रे मोरा या गाण्याच्या तालावर तिनं केलेला नाच... मराठी संस्कृतीत वाढलेल्या कितीतरी बालिकांनी पहिला डान्स केला असेल तर तो याच गाण्यावर. आशाताईंचा गोड आवाज, ‘गदिमां’चे शब्द आणि ‘पुलं’च्या संगीतावर ठेका धरत नाचणारी चिमुकली पावलं असं दृश्य ज्यांनी पाहिलं, त्यांच्या ओठांवर आजही हे गीत आल्याशिवाय राहत नाही. बालपणीच्या आठवणींच्या सरी झरझर झरू लागतातच... 

झरझर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ
काहीतरी गाऊ
करून पुकारा नाच... नाच रे मोरा...

‘गदिमां’नी किती सहज-सोप्या शब्दांमध्ये हे गीत लिहिले आहे. लय घेऊनच आलेल्या शब्दांना गेयता लाभलेली. या कवितेला चाल लावणं ‘पुलं’ना किती आनंददायी झालं असेल? ‘गदिमां’नी लिहिलेली बालगीतं, मुलात मूल होऊन लिहिलेली आहेत. बालमनाची कोमलता जपणारी आणि बालमनाला आनंदानं फुलवणारी. त्यांनी लिहिलेली गाणी, त्या गाण्यांमधलं ‘नाच रे मोरा’ हे गाणं प्रत्येकाच्या बालपणाशी नातं सांगणारं नव्हे, तर बालपण जपणारं आहे. घरपण जपणाऱ्या कितीतरी घरांतले आजी-आजोबा आपल्या नातीला हे गाणं शिकवताना आपलं वय विसरून जातात. नातीबरोबर ठेका धरत नाचू लागतात...

थेंब थेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानात वाजती रे
पावसाच्या रेघांत
खेळ खेळू दोघांत
निळ्या सौंगड्या नाच... नाच रे मोरा...

सौंगड्या म्हणजे सोंगाड्या नाही हं.... तर ‘सवंगडी,’ किती गोड शब्द! मोबाइल गेमच्या जमान्यातल्या मुलांना या शब्दाचं महत्त्व कसं कळावं? शब्दांच्या गमतीजमती, उपमा आणि काव्यसौंदर्यात ‘गदिमां’च्या प्रतिभेची प्रचिती आपल्याला येतेचच पण त्याबरोबर ‘पुलं’च्या संगीतरचनेचं कौशल्यही आपण विसरू शकत नाही. आशाताईंनी अनेक बालगीतं गायली आहेत; पण हे गीत गाताना त्यांच्या मनाचा मोरपिसारा कसा फुलून आला असेल, याची कल्पना करताना आपण हरवून जातो. 

बालदिन साजरा करताना आवर्जून हे गाणं आठवलं. कारण नव्या पिढीतल्या बालकांना बालगीतांची गोडी चाखता यावी यासाठी मोठ्यांनी मदत करायची आहे. चॉकलेट, पास्ता, पिझ्झा, नूडल्स हे सर्व दिलं म्हणजे त्यांचं बालपण जपलं असं नाही, तर बालपणीचा आनंद जपणारी बालगीतंही त्यांना ऐकवली पाहिजेत. ‘रिअॅलिटी शो’मधून प्रेमगीतांच्या तालावर नाचणारी लहान मुलं पाहिली की खेद वाटतो. बालचित्रपट, बालनाट्यं, बालगीतं, कथा-गोष्टी हा बालपणीचा अनमोल ठेवा जपायला आणि जोपासायला आपणच शिकवलं पाहिजे. अर्थात ही शिकवणी न वाटता सहजपणे नकळत झालेला संस्कार असावा. आपल्या मनावर झालेला ‘नाच रे मोरा’चा अवघ्या निसर्गालाच सवंगडी करण्याचा संस्कार अजूनही कुठं पुसला गेलाय? आताही शब्द न् शब्द आठवतोय, मनमोराचा पिसारा फुलवतोय... पावसाची रिमझिम आणि सातरंगी कमान अनुभवायला देतोय... व्वा! ‘गदिमां’ची ही बालकविता ‘पुलं’च्या स्वररचनेतून आणि आशाताईंच्या गोड गळ्यातून ऐकता ऐकता कितीतरी बालमनं मोहरतील आणि आपल्याही बालपणीच्या आठवणी रिमझिमत राहतील, पाऊस थांबला तरी...

पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान
सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच... नाच रे मोरा...


- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रातून वरिष्ठ उद्घोषिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)
 
(कविता... स्वरांनी मोहरलेल्या या सदराचे पुस्तक आणि ई-बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)




BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZTKBI
Similar Posts
फिरुनी नवी जन्मेन मी... वैविध्यपूर्ण गाणी गाणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा आठ सप्टेंबर हा जन्मदिवस नुकताच होऊन गेला. त्या निमित्ताने, ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज पाहू या ‘फिरुनी नवी जन्मेन मी’ ही सुधीर मोघे यांची सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली आणि आशाताईंच्या स्वरांनी सजलेली कविता ...
कठीण कठीण कठीण किती... २३ जानेवारी हा नाटककार, कवी राम गणेश गडकरी यांचा स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘कविता... स्वरांनी मोहरलेल्या’मध्ये आज आस्वाद घेऊ या त्यांच्या ‘भावबंधन’ या नाटकातल्या ‘कठीण कठीण कठीण किती, पुरुषहृदय बाई...’ या पदाचा...
जोवरी हे जग, तोवरी गीतरामायण... ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात रामनवमीच्या औचित्याने गीत रामायणावरचा हा लेख....
घाल घाल पिंगा वाऱ्या... अत्यंत तरल भावकविता लिहिणारे कवी कृ. ब. निकुंब यांचा आज, नऊ ऑगस्ट रोजी जन्मदिन आहे. त्या निमित्ताने, ‘कविता स्वरांनी मोहरलेल्या’ या सदरात आज ‘घाल घाल पिंगा वाऱ्या...’ या त्यांनी लिहिलेल्या हृदयस्पर्शी कवितेबद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language